हा ब्लॉग शोधा

बुधवार, २२ जुलै, २०२०

Ranu Mondal (रानू मंडल)

आपल्या मोबाईलवर एक व्हिडिओ येतो ज्यात रेल्वे स्टेशन वर  59 वर्षांची एक महिला गाणं गाते आहे "एक प्यार का नागम है मौजो की कहाणी है". आपण जेंव्हा हे गाणं ऐकतो तेंव्हा तल्लीन होऊन ऐकत राहतो. मग आपण हे बघत नाही की त्याला कोणत्याही संगीताची साथ नाही, तिथे कसल्याही प्रकारचं स्टेज नाही,  समोर बसलेला प्रेक्षकवर्ग नाही. आपण फक्त ते गाणं ऐकतो. ऐवढा सुरेल आवाज. मग आपण शोधायला लागतो की ऐवढा सुरेल आवाज असणारी ही बाई कोण आहे ? स्टेशनवर का गाणं गाते आहे ? 
हळूहळू त्या बाई बद्दल बरीच माहिती आपल्या समोर यायला लागते.

रानु मंडल हे नाव अक्षरशः प्रत्येकाला माहीत आहे. प्रत्येकाने त्यांचा रेल्वेस्टेशनवर  "एक प्यार का नागम है, मॊजो की कहाणी है" हे लता दीदींच गाणं गायलेला व्हिडीओ बघितला आहे. काही दिवसांत तो व्हिडीओ
प्रचंड प्रमाणात बघितला गेला.  Social media वर व्हायरल झाला. आणि त्या स्टार झाल्या. स्टार झाल्या आणि काहीतरी खटकलं. आणि त्या पुन्हा गायब झाल्या. 

कशी झाली या सगळ्या प्रवासाची सुरुवात?
तर...
पश्चिम बंगाल मधील राणाघाट रेल्वेस्टेशन वर रानु मंडल गाणी गायच्या. त्यांचा तो सुरेल आवाज ऐकायला लोक प्रवासाच्या धावपळीत सुद्धा क्षणभर थांबायचे. असंच एकदा अतींद्र चक्रवर्ती नावाच्या व्यक्तीने त्याच रेल्वे स्टेशनवर मंडल यांचा "एक प्यार का नागमा है मौजो की कहाणी है" हे लतादीदींच गाणं गातानाचा व्हिडीओ केला. आणि तो फेसबुकवर अपलोड केला. आणि बघता बघता तो व्हिडीओ व्हायरल झाला. करोडो लोकांनी तो व्हिडीओ बघितला. आणि त्या नंतर रानु मंडल यांचं आयुष्य बदललं. त्यांच्या आयुष्याने जोरदार वेग घेतला. आणि प्रसिद्धीचा प्रकाशझोत त्यांच्यावर पडला. अगदी लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांना हे नाव परिचित झाले. मग हिमेश रेशमिया यांनी मंडल यांना बॉलिवूड मध्ये गाण्यासाठी ब्रेक दिला. ते गाणं होत 
"तेरी ही मेरी ही तेरी मेरी तेरी मेरी ही कहाणी..."

 रानु मंडल स्टार झाल्या. त्या मोठमोठ्या कार्यक्रमामध्ये दिसू लागल्या. लोकांना त्यांना बघायला आवडायला लागलं. लोकांना त्यांच्या सोबत सेल्फी घ्यावीशी वाटायला लागली. आणि इथेच माशी शिंकली. 
एका महिलेला सेल्फी द्यायला नकार दिला म्हणून रानु मंडल सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल झाल्या. आणि त्यांच्या प्रसिद्धीला उतरती कळा लागली. आज त्या प्रसिद्धी माध्यमातून गायब झाल्या. (कोणी म्हणतं हल्ली त्या  स्टेज शो करण्यात व्यस्त आहेत तर कोणी म्हणतं त्यांच्या आयुष्यावर चित्रपट तयार केला जात आहे आणि त्याच त्यात काम करणार आहेत म्हणून त्या व्यस्त आहेत. पण हे मात्र नक्की की त्या social media मधून गायब आहेत). त्यांचा सुरेल आवाज लोकांना नकोसा वाटायला लागला. प्रसिद्धीची हवा डोक्यात गेली अस लोकांना वाटायला लागलं. 

येथे हा प्रश्न उपस्थित होतो की मंडल यांनी अशी काय चुक केली, की त्यांना त्याची एवढी मोठी किंमत मोजावी लागली ! 
सेल्फीला नाही म्हणाल्या म्हणून समाज त्यांच्यासोबत असा वागू शकतो का ? किंवा अस वागणं योग्य आहे का? हे आपण बघितलं पाहिजे. वास्तविक पाहता एखादी व्यक्ती जेंव्हा Celebrity होते तेंव्हा तीचं personal life हे बऱ्यापैकी Social झालेलं असतं.  Personal space फार कमी झालेली असते. प्रसिद्धीच्या बदल्यात आपलं personal life आणि  space गमावणे ही प्रत्येक celebrity च्या आयुष्याचा भाग होऊन जातं. कदाचित हेच रानु मंडल यांना समजलं नसावं. किंवा हे सगळं समजण्यासाठी त्यांना वेळ हवा होता पण त्यांच्या आयुष्यात हे सगळं एवढं झटपट झालं की त्यांना विचार करायला स्वतःवर काम करायला वेळच मिळाला नाही. 
यश मिळवणं हे अवघड आहेच पण त्या पेक्षा जास्त अवघड आहे ते टिकवणं. आणि नेमकं हेच अनेकांना जमत नाही. 

खरंतर रानु मंडल ने एका सेल्फीला नकार दिला म्हणून आपण रानु मंडल आणि त्यांच्या कलेला नकार देणे कितपत योग्य आहे ? असंही असू शकेल की त्यांना या प्रसिद्धीचा प्रचंड ताण आला असेल. रेल्वे स्टेशनवर कुठेतरी एका कोपऱ्यात बसून मोकळेपणाने गाणं गाणाऱ्या बाईला गर्दी मध्ये comfortable वाटत नसेल. सुरुवातीला त्यांना हे सगळं छान वाटलं असेल पण नंतर त्याचा त्रास होत असेल. किंवा हेच लोक प्रेम करतात आणि हेच लोक social media वर troll करतात हे त्यांच्या आकलन क्षमतेच्या बाहेरचं असेल. किंवा celebrity झाल्यावर समाजात वेगळं आणि personal life मध्ये वेगळं वागायचं असतं हे त्यांना तोपर्यंत माहीत झालेलं नसेल. मनुष्य म्हटल्यावर त्याच्या मानसिक अवस्थेचे वेगवेगळे पैलू असतात. कदाचित आपण ते समजून घ्यायला पाहिजे होतं का? त्यांच्या makeup केलेल्या एका photo ला मुद्दामहून Edit करून त्यावर त्यांना एवढ्या प्रमाणात troll केलं की त्या Makeup artist ला स्वतःहून original फोटो Social media वर पोस्ट करावा लागला आणि कोणीतरी मुद्दामहून हे करत आहे ते सांगावं लागलं. अशा प्रकारची trolling झालेली असताना कोणत्या नवख्या व्यक्तीला मानसिक ताण येणार नाही? नवखी आहे, रेल्वे स्टेशनवर गाणारी आहे तिचा बचाव करायला कोणी पुढे येणार नाही या गोष्टी लक्षात घेऊनच त्यांना जास्तीत जास्त troll करण्यात आलं. हे मान्य आहे, की आपणच त्यांना Star केलं पण म्हणून त्याची ही किंमत वसूल करायची का ? एखाद्या व्यक्तीच्या कलेमुळे आपलं मनोरंजन होतं पण त्या व्यक्तीच्या व्यंगामुळे किंवा प्रतिमा मलिन करण्याने आपलं मनोरंजन होत असेल तर ही एक प्रकारची विकृती नाही का? 

मग रानु मंडल ह्या रेल्वेस्टेशनवरच बऱ्या होत्या असं वाटायला लागतं. किमान तिथे त्यांना क्षणभर का असेना मान होता. लोकांना कुतूहल वाटायचं. 

ज्यावेळेस मी आजही असंच एखाद्या नवीन कलाकाराचा व्हायरल झालेला व्हिडीओ बघतो, तेंव्हा वाटत राहतं की, आपण जर असंच वागणार असू, सेल्फीला नाकारलं म्हणून आपण त्या व्यक्तीलाच नाकारणार असू, तर ती व्यक्ती आहे तिथेच बरी आहे. तिचा रानु मंडल नको व्हायला. 




शुक्रवार, १० जुलै, २०२०

Jagdeep सुरमा भोपली आणि शोले

 

सुरमा भोपली

सय्यद इश्तियाक अहमद जाफरी  म्हणजेच जगदीप यांचं बुधवारी निधन झालं.

जगदीप यांना शोले चित्रपटातील सुरमा भोपाली या पात्राने खूप प्रसिद्धी मिळवून दिली. बरेच लोक त्यांना सुरमा भोपाली या नावानेच ओळखतात . (अर्थात हे त्यांचं अभिनयाचं कसब आहे. त्यांच्या इतरही भूमिका दर्जेदार आहेत.) 
वास्तविक पाहता शोले या चित्रपटाने बऱ्याच कलाकारांना ओळख दिली. म्याक मोहन यांना सांभा , विजू खोटे यांना कालिया,  अमजद खान यांना गब्बर अजून बरेच आहेत. 
हे सगळं लिहिण्याचं कारण एवढंच आहे की, सय्यद इश्तियाक अहमद जाफरी  म्हणजेच जगदीप हा अभिनेता किती कसलेला होता हे शोले चित्रपटातील त्यांच्या सिन वरून समजतं. (त्यांच्या बद्दल च्या प्रेमापोटी एकेरी उल्लेख केला आहे.)

वास्तविक पाहता शोले चित्रपटात जगदीप म्हणजेच सुरमा भोपाली याचा Scene असरानी म्हणनेच जेलर च्या Scene नंतर लगेच येतो. 
"हम अंगरेज के जमाने के जेलर है !  हा हा ..." अस म्हणणारा असरानी त्याची चालण्याची लकब. धडपडणे, चिरक्या आवाजातील बोलणे, खरंतर ओरडणे हे अफलातून झालं आहे. असरानी ला बघितलं की आज ही आपल्याला तोच संवाद आठवतो.

 "हम अंगरेज के जमाने के जेलर है! हा हा "

पण खरी गंमत ही आहे की अश्या प्रचंड विनोदी सिन नंतर लगेच जगदीप चा सुरमा भोपाली चा Scene येतो. या Scene मध्ये सुरमा भोपाली आपल्या लाकडाच्या वाखारीत, एका उंचवट्यावर बसून समोर बसलेल्या श्रोत्यांना, जय आणि विरुला त्याने एकट्याने कस पकडलं आणि एक एक मुस्कटात मारून कसं पोलिसांच्या ताब्यात दिलं, हे धडधडीत खोटं सांगतो आहे.  आणि ते ही जय आणि विरु त्याच्या मागे उभे असताना (अर्थात हे त्याला  सुरुवातीला माहित नसतं)  हा  Scene जेलर च्या scene नंतर लगेच आहे. प्रेक्षक जेलरच्या scene ला मनमुराद हसलेले असताना. पुढच्या नवीन पत्राच्या scene ला हसतील का ? हा प्रश्न येतो. पण या जगदीप नावाच्या बहाद्दराने चित्रपटातील हास्याचा आलेख खाली येऊ दिला नाही. उलट तो वर वर घेऊन गेला. त्याची अभिनयाची शैली, त्याचा तो गाडी अडकत अडकत चालावी असा विशिष्ट आवाज याच्या जोरावर त्याने तो छोटासा scene अफलातून केला आहे. तो जय विरुला पकडण्याची कथा सांगतो ती खोटी आहे हे समजतं आपल्याला पण तरीही आपण त्या कथेत गुंतत जातो, आणि प्रेक्षक म्हणून आनंदही घेतो. आपलं पितळ उघड पडल्यावर तो ज्या पद्धतीने त्याच्या समोर बसलेल्या प्रेक्षकांवर ओरडतो ते बघण्या सारखं आहे.  एखाद्या वाघा सारखा सुरमा भोपाली जय आणि विरु समोर आल्यावर सशासारखा अंग चोरून घेतो. त्याचं ते असं वागणं आपल्याला फार आनंद देऊन जातं. जेवढी भूमिका वाट्याला आली तेवढी चोख केली या जगदीप नावाच्या अभिनेत्याने.  

आज हा जगदीप आपल्यात नसला तरी त्याचं ते मन प्रसन्न करणार काम नेहमी आपल्यात असेल. ईश्वर त्याच्या आत्म्यास शांती देवो. 

https://vnkale.blogspot.com/2020/07/blog-post.html

https://vnkale.blogspot.com/2020/07/actor.html








रविवार, ५ जुलै, २०२०

देशी वृक्ष आणि वृक्षारोपणाची योग्य पद्धत

 देशी वृक्ष कोणते आणि वृक्षारोपणाची योग्य पद्धत

       प्रत्येकाला वृक्षारोपण करायची इच्छा असते  पण त्याची योग्य पद्धत माहीत नसल्यामुळे आपल्याला कळत नाही कोणत्या झाडांची निवड करावी. ते माहीत असणं फार आवश्यक आहे. त्याची यादी आम्ही खाली देत आहोत .   

बरेचजण ढोबळमानाने वृक्षारोपण करतात. परदेशात वृक्षांची संख्या जास्त आहे हे आपण वाचलेलं असतं मग आपणही  न विचार करता आपल्या देशातील भौगोलिक परिस्थिती लक्षात न घेता वृक्षारोपण करतो. हे अशापद्धतीने वृक्षारोपण करणे आपल्याला इथून पुढे परवडणारे नाही. भौगोलिक दृष्ट्या आपल्या वातावरणात कोणती झाडे तग धरू शकतात जगू शकतात यांची माहिती असणं आवश्यक आहे. त्याच बरोबर आपल्या देशी वृक्षांची लागवड होणं आवश्यक आहे ना की परदेशी वृक्षांची. 

 बऱ्याचदा अस होतं की आपण लावलेली झाडे जळुन (मरून) जातात. झाडं योग्य वातावरणात फार झपाट्याने वाढतात. माणसाला जसं योग्य शेजार गरजेचा असतो , तसाच झाडांनाही असतो. किंबहुना झाडांना अधिक असतो. म्हणून आपल्याला झाडं लावायची असतील तर योग्य ठिकाणी योग्य झाड लागणं फार गरजेचे असतं. 

कोणती झाडे कुठे लावावीत याची एक यादी खाली देत आहोत.

 घराच्या परिसरात लावावयाची झाडे


1 रक्तचंदन
2 चंदन
3 उंबर
4 बकुळ
5 पारिजातक
6 बेल
7 कुसुम ई.



रस्ताच्या कडेने लाववायची झाडे

1 कडुनिंब
2 करंज
3 वड
4 उंबर 
5 चिंच
6 पिंपळ
7 नांद्रुक
8 शिसव
9 शिंदी

शाळेच्या परिसरात लाववायची झाडे

1 वड
2 पिंपळ
3 नांद्रुक
4 चिंच
5 उंबर
6 जांभूळ 
7 पेरू
8 आंबा 

मंदिराच्या आवारात लाववायची झाडे

1 कडुनिंब
2 करंज 
3 वड
4 उंबर
5 चिंच
6 पिंपळ
7 कांचन
8 शमी
9 आपटा
10 चाफा 
11 पाखर
12 बेल


झाडांचं सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे ऑक्सिजन देणे. ही आपली जबाबदारी आहे की जास्तीत जास्त ऑक्सिजन देणाऱ्या झाडांची लागवड करणे.

12 तासांपेक्षा अधिक वेळ ऑक्सिजन देणारी झाडे 

1 वड
2 पिंपळ
3 नांद्रुक
4 उंबर 
5 कडुनिंब
6 कदंब 



स्थानिक प्रजातींची झाडे लावणे जास्त फायद्याचं ठरतं

स्थानिक प्रजाती

1 आवळा 
2 कडुनिंब
3 कांचन
4 करंज
5 चिंच
6 वड
7 पिंपळ
8 उंबर
9 नांद्रुक 
10 बांबू 


 
कित्येक झाडांचा औषध म्हणून उपयोग होतो. आपण ती झाडे लावली तर त्याचा जास्त उपयोग होईल आणि औषधी वनस्पती असल्याने त्याची तोड होणार नाही. 







काही औषधी वनस्पतींची यादी


1 कडुनिंब
2 आवळा 
3 हिरडा
4 बेहड
5 निरगुडी 
6 रिठा
7 अर्जुन
8 शिवन
9 टेंटू 


देशी वृक्ष

अंकोळ, अंजन, अंजनी, अजानवृक्ष, अर्जुन, अशोक, आईन (ऐन), आपटा, आंबा, आवळा, उंडी (कॅलोफिलम इनोफिल्युम), औदुंबर, धेड उंबर, कडुनिंब (नीम-लिंबोणी), कढीलिंब, बकान नीम (बकाणा), महानीम, कदंब, कनकचंपा, करंज, मोठा करमळ, कवठ, कहांडळ, कळम (कळंब), काकड, कांचन, पिवळा कांचन, रक्तकांचन, श्वेतकांचन, काजरा, काटेसावर, किनई, काळा कुडा, पांढरा कुडा, कुंती, कुंभा, कुसुम (कुसुंब) किंवा कोशिंब, कोकम, खडशिंगी, खरवत, खिरणी, खेजडी म्हणजेच शमी (प्रोसोपिस सिनेरारिया), खैर, गरुडवेल, गुंज, रतनगुंज, गेळा, गोळ, घटबोर, चंदन, चंदनचारोळी, चारोळी, चाफा, नागचाफा, सोनचाफा, चिंच, चिचवा, चीड (सरल किंवा पाईन - पायनस एक्सेलसा), जांभूळ, जायफळ, टेटू, टेमरू, टोकफळ, डलमारा, ताड, तांबट, तामण, दहीवण, दालचिनी, देवदार, धामण, धावडा, महाधावडा, रेशीम धावडा, नाणा, नांद्रुक (नांदुरकी), निरगुडी, नेपती, पळस, काळा पळस (तिवस किंवा रथद्रुम), पांगारा, बूच पांगारा, रानपांगारा, पाचुंदा, पाडळ, पायर, पारिजातक, पिंपळ, परस पिंपळ, पुत्रंजीव, पेटरा, पेटारी, पोलकी, फणस, फणशी, फालसा, बकुळ, जंगली बदाम, बहावा, बाभूळ, दुरंगी बाभूळ, बारतोंडी, बिब्बा, बीजा, बुरगुंड, बुरास, बूच, बेल, बेहडा, बोर, भुत्या, भूर्जपत्र, भेरा, भोकर, भोमा, माड, भेरली माड, मारवा, मुचकुंद, मेडशिंगी, मोई, मोखा, मोह, दक्षिण मोह, रबराचे झाड, रिठा, रुद्राक्ष, रोजवुड (शीशम-शिसवीचे झाड), रोहितक, लकूच, वड, वानवृक्ष, वायवर्ण, वारंग, पिवळा वारस, वावळ, वाळुंज,शिवण, शिरीष, काळा शिरीष, संदन, साग, सालई, सुकाणू, सुपारी, सुरंगी, सोनसावर ऊर्फ गणेर (कोच्लोस्पेरम रेलिजियोसम), हिरडा, हिवर, वगैरे.


परदेशी वृक्ष

अगस्ता (हादगा), अनंत (केप जॅस्मिन), ट्री ॲंटिगोनान, रोज ॲपल (जाम), स्टार ॲपल, अंब्रेला ट्री, खोटा अशोक (पानाचा अशोक, मास्ट ट्री), ऑंकोबा, ऑर्किड ट्री (बटरफ्लाय फ्लॉवर), हॉंगकॉंग ऑर्किड ट्री, ब्राझिलियन आयर्नवुड, ऑलिव्ह, ऑस्ट्रेलियन चेस्टनट, मोगली एरंड (जट्रोफा), सिल्व्हर ओक, ऊर्वशी (ॲमहर्स्टिया नोबिलिस), कॅंडल ट्री, कण्हेर, पिवळा कण्हेर (बिट्टी), कॅंपेची ट्री (लॉगवुड), कमरक (करंबोला), कॅशियाच्या अनेक जाती, गुलाबी कॅशिया, रेड कॅशिया, काशीद (सयामी कॅशिया), कॉपर पॉड ट्री, इंडियन कॉर्क ट्री, स्कार्लेट कॉर्डिया, कॉलव्हिल्स ग्लोरी, काशीद (सयामी कॅशिया), कैलासपती (कॅननबॉल ट्री), कनांगा (यांग यांग), क्रेप मिर्टल, क्लुसिया (फॅट पोर्क ट्री), ख्रिसमस ट्री (ऑराकरिया), गमग्वायकम (लिग्नम व्हिटी), गिरिपुष्प (ग्लिरिसिडिया), गुजबेरी ट्री, गोल्डन बेल (पिवळा टॅबुबिया), पांढरा चाफा (डेडमॅन्स प्लॉवर, टेंपल ट्री), कवठी चाफा, तांबडा चाफा (रेड फ्लॅंगिपनी), गोरखचिंच (बाओबाब), विलायती चिंच (इमली), चेंडूफळ (पार्किया), सिंगापूर चेरी, ऑस्ट्रेलियन चेस्टनट, जॅक्विनिया, जाम, टॅबुबियाच्या अनेक जाती, टॅबुबिया ॲव्हेलेनेडी, पिवळा टॅबुबिया (गोल्डन बेल), टिकोमा, आफ्रिकन ट्युलिप ट्री (स्पॅथोडिया), रोझी ट्रंपेट ट्री, ट्रॅव्हेलर्स ट्री, डॉंबेया (वेडिंग प्लॅंट), डेडमॅन्स फ्लॉवर (टेंपल ट्री, पांढरा चाफा), ड्रासिना, तुती (मलबेरी), तुमा (मिलेशिया), जेरुसलेम थॉर्न, दिवी दिवी, निलगिरी (युकॅलिप्टस), पर्जन्यवृक्ष (रेन ट्री), ब्लॅक पर्ल, पामच्या अनेक जाती, अरेका पाम, चायनीज फॅन पाम, रॉयल पाम (बॉटल पाम), पावडरपफ, नीरफणस (ब्रेड फ्रूट ट्री), फिडल लीफ फ़िग, फिडल वुड ट्री, फ्लॉस सिल्क ट्री, बूच, तेल्पा माड (ऑइल पाम), गुलमोहर (फ्लॅंबॉयंट ट्री), नीलमोहर (जॅकारंडा), ताम्रवृक्ष किंवा पीतमोहर (पेल्ट्रोफोरम), बटर फ्रूट ट्री (ॲव्होकॅडो), खोटा बदाम, बरसेरा (अत्तराचे झाड-लव्हेंडर ट्री), बिलिंबी, बिट्टी (पिवळा कण्हेर), बेगर्स बाऊल, बॉटल ब्रश, ऑस्ट्रेलियन बाभूळ, ब्रह्मदंड (सॉसेज ट्री), ब्लडवुड ट्री, ब्राउनिया, भद्राक्ष (गाउझुमा), मलबेरी (तुती), पेपर मलबेरी, महोगनी, आफ्रिकन महोगनी, मारखामिया, मोरपंखी (थूजा), राय‍आवळा, चेंजेबल रोज ट्री, लक्ष्मीतरू (सायमारुबा), शंबुकोश (सांबुकस), शेर (मिल्क बुश), संकासुर (शंखासुर, पीकॉक फ्लॉवर ट्री), मोठी सातवीण, गुलाबी सावर (शेविंग ब्रश ट्री), दिल्ली सावर, पांढरी सावर (कपोक), सॉसेज ट्री (ब्रह्मदंड), सुरू (कॅश्युरिना, खडसावर), सुबाभूळ (हॉर्स टॅमेरिंड, लुकेना), स्पॅथोडिया (आफ्रिकन ट्युलिप ट्री), हुरा (सॅंडबॉक्स ट्री), वगैरे.


वरील यादी वाचून आम्हाला आशा आहे की तुम्ही या पावसाळ्यात किमान एक तरी देशी रोप लावाल आणि त्याचं झाड कराल. 

आभार पाणी फाउंडेशन 


धन्यवाद 🙏






गुरुवार, २ जुलै, २०२०

ACTOR














      ACTOR




Hey Stella!! 
अशी अवकाशाची पोकळी व्यापून टाकणारी हाक कानावर पडते,
Marlon Brando ची

खाडकन उठतो मी बेडमधून 
मिळेल ते पुस्त्तक वाचायला लागतो अधाश्यासारखं
माझ्या mobile मध्ये असेल ती movie बघतो बरकाव्यांसहीत
पुन्हा पुन्हा Brando च्या मनातले भाव समजून घ्यायचा प्रयत्न करतो

तो बाहेर तसाच उभा असतो, 
माझी वाट बघत
आता त्या Stella ऐवजी माझंच नाव ऐकू यायला लागतं मला, Vitthala
बाहेर कोणाशी तरी बोलतो तो माझ्याबद्दल
‘‘I will make him an offer he can’t refuse’’

मग धाडकन माझ्या रूम मध्ये येतो
माझे खांदे पकडून मला हलवून जागा करतो
माझ्या डोळ्यांमध्ये नजर रोखून म्हणतो
“Be like a man!” 
Character चा सामना कर
त्याच्या पासून पळू नको
“Character can’t move without you... He is waiting for you... Make him free to fly”
मग जरा शांत होत म्हणाला
बाळ, character ची माहिती फक्त गोळा करायची नसते
ती आत्मसात करून मांडायची असते
रिकाम्यावेळी ती आत्मसात कर
बाहेर पड, बरीच पात्रं वाट पाहत आहेत तुझी
रडू नको जवळ काही नाही म्हणून
लक्षात ठेव ज्यांच्या जवळ काही नसतं फक्त त्यांनाच संधी असते, 
बरंच काही मिळवण्याची

तो निघून जातो
मी पुन्हा पुन्हा Brando  च्या मनातले भाव समजून घ्यायचे प्रयत्न करतो
आणि Brando चा किमान शंभरावा तरी भाग व्हावं, 
असं वाटत राहतं

मग करतो त्या  Hey Stella!! ची rehearsal आरशा समोर, 
वेळेचं भान विसरून
तोच आरशात माझ्या पाठीमागे उभा असतो 
Robert De Niro ! 
गालातल्या गालात हसत
हळूच खांद्यावर हात ठेवून मला समोरून पाहायला सांगतो
मग आरसा आणि मी एकच होतो
“You talking to me? You talking to me?  I’m the only one here”
असंख्य पद्धतीने मला शिकवतो
पुढे फक्त त्याचे डोळे बोलतात 
“You talking to me ?”
आणि ढकलतो मला अभिनयाच्या समुद्रात
या समुद्रातील कोट्यावधी, अगणित, अनंत जीव म्हणजे पात्राच्या मनातील भाव भावना आहेत
एवढं सगळं असतं भरलेलं फक्त एका पात्रात ! 
‘ते’ दाखव तू
मुठभर भावभावना दाखवून दुकान मांडू नको acitng चं
असं म्हणून त्यानं जोरकस सूर मारला त्या समुद्राच्या खोल पोटात
तिकडे काहीतरी आहे म्हणाला

थकून मी किनाऱ्यावर आलो
वाळूवर शरीर टाकावं म्हणलं, 
तोच त्या काठीचा खटट् असा आवाज आला मागून, 
पाहतो, तर मागे 
Al Pacino  
हाताच्या अंतरावर
अंध Al Pacino
“I’m in the dark here. There was a time I could see”
असं म्हणून मला शोधायला हवेत हात फिरवला
क्षणार्धात मी त्याच्या हाताला लागलो 
किंचित चाचपडला, माझी ओळख पटली,
खांद्यावर हात टाकून निघाला मला घेऊन, 
अंधारातला प्रकाश शोधायला
लक्षात ठेव अंधाराचा सुद्धा त्याचा स्वतःचा एक उजेड असतो
चाचपडू नको, घाबरू तर नकोच नको
इतरांसारखा घाईघाईत अंधार मांडू नको
थोडा वेळ थांब, पेशन्स ठेव, मैत्री कर त्या अंधारा बरोबर
मग तुला तो त्याचा उजेड दाखवेल
डोळे दिपतील तुझे, घाबरू नको
तो उजेड तुझ्या डोळ्यांमध्ये भर
आणि हा प्रकाश दाखंव तू तुझ्या डोळ्यांमधून
लक्षात ठेव डोळे समोरच्याच्या हृदयाशी बोलतात
वाटेत त्याने हात सोडला,
एकटा चालायला शिक म्हणाला
त्याचा निरोप घेतला, 

रुममध्ये आलो मी माझ्या... अंधाऱ्या...
बेडवर पडलो
उशाशी हालचाल जाणवली
मी झट्कन मान वळवली
Morgan Freeman खुर्चीत बसलेला
हसला
खुर्ची सरकवून जवळ आला
माझ्या कपाळावर थोपटत थोपटत म्हणाला
संवेदना जाग्या ठेव
एका actor साठी फार गरजेचं असतं ते
रस्त्यावरचा असलास तरी 
बंगल्यातल्या पण संवेदना जाण
बारकाईने अनुभव, चौकस राहा
कोणाचा तिरस्कार करू नको
त्याचंही काहीतरी म्हणणं आहे
‘ते’ तू सांग
दुवा हो त्याच्यात आणि जगात
समोरच्याला बोलतं कर , 
तू मात्र शांत राहा

बऱ्याच जणांना आवाज नसतो
त्यांचा खणखणीत आवाज हो
धार आण तुझ्या विचारांना आणि अभिनयाला
दुबळं प्रतिनिधित्व करू नको त्यांचं
अन्याय आहे त्यांच्यावर हा

लक्षात ठेव, 
समोरच्याला ठेच लागली तर पाणी तुझ्या डोळ्यांत यायला हवंय
संवेदना जाग्या ठेव
उघड्या दरवाजातून Morgan Freeman नाहीसा झाला
दरवाजा बंद करायला उठलो 

तोच अंधारातून एक म्हातारा, 
धोतराचा सोगा हातात धरत, 
ताडताड चालत आला
निळूभाऊ फुले
मी काही बोलायच्या आत भाऊ ओरडले माझ्यावर
स्वप्नातून जागे व्हा, 
call time सांगायला आलोय सकाळचा
ST  ने जायचं आहे
लवकर या नाहीतर जागा मिळणार नाही बसायला
माझी प्रश्नार्थक नजर ओळखली
जवळ आले, माझ्या डोक्यावरून हात फिरवला
पोरा स्वप्न बघ! बघ स्वप्न! पण स्वप्नातच रमू नको
वास्तवात ये, 
अमाप कष्ट कर त्यांच्यासारखं
प्रामाणिक राहा तुझ्या अभिनयाशी आणि स्वतःशी
लक्षात ठेव आपली कलाकृती ही आपलंच प्रतिबिंब असते
भाऊ निघून गेले

माझ्या नकळत मी झोपी गेलो
पण हे सगळेजण खांबांप्रमाणे
भक्कम उभे आहेत माझ्या मागे
दीपस्तंभ, समुद्री वादळातले
उद्या पुन्हा  Brando येईल मला उठवायला किंवा
Tom Hanks  किंवा Leonardo DiCaprio
किंवा सगळेच येतील मला तयार करायला
मग, एक दिवस मी पण होईल तयार
वाट बघतोय मी
त्या दिवसाची
अगदी मागे का असेना
पण त्यांच्यात उभं राहण्याची ...

  _Vitthal Nagnath Kale





Ranu Mondal (रानू मंडल)

आपल्या मोबाईलवर एक व्हिडिओ येतो ज्यात रेल्वे स्टेशन वर  59 वर्षांची एक महिला गाणं गाते आहे "एक प्यार का नागम है मौजो की कहाणी है"....